सोहळा आंबेडकरी प्रतिभेचा...


मुंबई : प्रतिनिधी

 

आंबेडकरी कवयित्रींच्या तीन पिढ्यांमधील काव्यप्रवासाचा आढावा घेणाऱ्या 'मावेली प्रकाशना'च्या 'लिपिंग टुवर्ड्स दि डीप ब्लू स्काय' या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी झाले. माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रा. आशालता कांबळे, डॉ. शामल गरुड, डॉ. श्रीधर पवार, नंदा कांबळे, अॅड. निरंजनी, चयनिका, सुबोध मोरे, छाया दातार आदी मान्यवर उपस्थित होते.


या काव्यसंग्रहात तीन पिढ्यांमधील आंबेडकरी कवयित्रींच्या कविता आहेत. यात पहिल्या पिढीतील हिरा बनसोडे
, सुरेखा भगत, उषा आत्राम यांच्या कविता आहेत; तर दुसऱ्या पिढीतील डॉ. प्रज्ञा पवार, संध्या तांबे, छाया कोरेगावकर, शारदा नवले, वर्षा भिसे यांच्या कवितांसह तिसऱ्या पिढीतील दिशा पिंकी शेख, शीतल साठे, स्नेहा कदम, राजश्री गुडी, श्रीजा राव आदी कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे.

या काव्यसंग्रहाला उर्मिला पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. मूळ मराठी कवितांचा अनुवाद श्रीजा राव आणि सृजना निरंजनी श्रीधर पवार यांनी केला आहे.

या प्रकाशन समारंभात 'मावेली प्रकाशना'तर्फे काव्यवाचन आणि प्रश्नोत्तरांचे सत्र पार पडले. यात छाया कोरेगावकर, शारदा नवले, वर्षा भिसे, स्नेहा कदम या कवयित्रींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला; तर उषा आत्राम, दिशा पिंकी शेख, संध्या तांबे यांनी आपले मनोगत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यक्त केले.

हा कवितासंग्रह साकार करण्यात 'मावेली प्रकाशना'च्या अजित, हृतनय, काजोल, राही, पुण्यश्लोक, देवरूखकर, पल्लवी गंब्रे या सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.